रायगड : जखोपटेतील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश; कंपनीकडून रोजगाराची हमी
रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना टप्प्याटप्प्याने रोजगार देण्याचे कंपनीचे आश्वासन; तिसऱ्या दिवशी आंदोलन मागे उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा, या मागणीस
Success for the protest by project-affected people in Khopte; company provides assurance of employment


रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।

१९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना टप्प्याटप्प्याने रोजगार देण्याचे कंपनीचे आश्वासन; तिसऱ्या दिवशी आंदोलन मागे

उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या गेट बंद आंदोलनाला तिसऱ्या दिवशी यश आले. १९ स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना टप्प्याटप्प्याने कामावर घेण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिल्याने आंदोलकांनी समाधान व्यक्त केले.

मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे-बांधपाडा यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार (२९ ऑक्टोबर) पासून हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. स्थानिक बेरोजगारांना रोजगारासह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती.

दरम्यान कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांपैकी १० जणांना दोन दिवसांत, तर उर्वरित नऊ जणांना नोव्हेंबर महिन्यात कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी जल्लोष करत समाधान व्यक्त केले.

या आंदोलनाला आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, भाजप युवा नेते प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बी. एन. डाकी, नगराध्यक्षा भावना घाणेकर, कामगार नेते रवी घरत आणि मनसे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.

दरम्यान, कंपनीने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यामुळे रोजगाराच्या आश्वासनाची प्रत्यक्ष पूर्तता होते का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande