
बीड, 01 नोव्हेंबर (हिं.स.) धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा ते कोळवाडी घाटात शनिवारी सलग घडलेल्या भीषण अपघातांमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. उतारावर उभ्या असलेल्या पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या एका मोठ्या कंटेनरवर मागून येणारी तीन वाहने एकापाठोपाठ एक आदळल्याने हा थरारक अपघात झाला.
बीडकडे येणारा एक मालवाहू कंटेनर (टी.एन. ३९ बी.टी. ५७७९) उतारावर उभ्या असलेल्या पवनचक्कीच्या कंटेनरवर जोरात जाऊन धडकला. या धडकेत तमिळनाडू येथील सुब्रह्मण्यम सेनगुंडन (वय ५०) या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. दुपारच्या सुमारास त्याच ठिकाणी आणखी एक राजस्थान पासिंगचा मालवाहू ट्रक (आर.जे. १७ जी.बी. १३४६) आणि केमिकल वाहतूक करणारा कंटेनर धडकला. या दुसऱ्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजस्थानच्या ट्रक चालकाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या सलग अपघातांमुळे मांजरसुंबा घाटात रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. डिझेल वाचवण्यासाठी उतारावर वाहने बंद करून चालवल्याने चालकाचे नियंत्रण सुटते आणि असे अपघात होतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एका लेनने वाहतूक सुरळीत केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis