
रायगड, 11 नोव्हेंबर, (हिं.स.)। चौक I चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरील वाहनांची वाढती वर्दळ, रस्त्यालगतची अतिक्रमणे, सुरू असलेली खोदकामे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढल्याने या समस्येत अधिक भर पडत आहे.
चौक परिसरातील रस्त्यांवर पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइन आणि इंटरनेट केबल टाकण्यासाठी वारंवार खोदकाम केले जाते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. त्यातच रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी वाहने, अवजड वाहनांची वर्दळ आणि दुचाकी व तीनचाकी चालकांकडून अरुंद जागेतून पुढे जाण्याची धडपड यामुळे कोंडी वाढते.
या वाहतूक कोंडीचा फटका स्थानिक नागरिक, नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांना बसत आहे. काही अंतर पार करण्यासाठीही अधिक वेळ लागत असून, इंधनाचा अपव्यय आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात भर पडत आहे. कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यास रुग्णांच्या उपचारासाठीही विलंब होण्याची शक्यता आहे.
चौक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमित नियंत्रण ठेवणे, बेशिस्त पार्किंगवर कारवाई करणे आणि रस्त्यांची कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)