
कोर झोनमध्ये आढळला वाघाचा मृतदेह; वनविभागाकडून तपास सुरू
गोंदिया, 11 नोव्हेंबर (हिं.स.) : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने चिंताजनक बातमी समोर आली आहे. नागझिरा अभयारण्याच्या कोर झोनमध्ये एका वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक तपासात वाघाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी वनविभागाने कारवाई करत सात संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, वाघाच्या मृत्यूमागे शिकारीचा कट किंवा अवैध वीजजोडणीचा संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्यात वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. १० नोव्हेंबर रोजी नागझिरा कोअर वनक्षेत्रातील थाटेझरी बीटअंतर्गत कक्ष क्रमांक ९९ मधील राखीव वनक्षेत्रात नियमित गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना वाघाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
प्राथमिक तपासणीदरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणी वनविभागाने सात संशयितांना अटक केली आहे. नागझिरा क्षेत्राचे उपसंचालक प्रीतमसिंह कोडापे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वाघाला विजेचा धक्का नेमका कसा लागला आणि या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, याचा शोध वनविभाग घेत आहे.
एनटीसीएच्या नियमानुसार विशेष समितीची स्थापना
वाघाच्या मृत्यूच्या तपासासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) निर्धारित प्रक्रियेनुसार विशेष समिती स्थापन करण्यात आली. या समितीत मानद वन्यजीव रक्षक सावंत बहेकार एनटीसीएचे प्रतिनिधी रूपेश निवाते, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे सदस्य इद्रिस अहमद तसेच पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश होता.
समितीच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय पथकाने वाघाचे शवविच्छेदन केले. प्राथमिक निरीक्षणात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने तपासणी सुरू आहे.
वाघाचे सर्व अवयव ; व्हिसेराचे नमुने संकलित
शवविच्छेदनादरम्यान वाघाचे सर्व अवयव सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचे आढळून आले. शवविच्छेदनानंतर पंचांच्या उपस्थितीत वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील वैज्ञानिक तपासणीसाठी व्हिसेराचे नमुनेही संकलित करण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील तपासणीतून वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
अर्जुनी मोरगाव वनक्षेत्रातून चार ट्रॅप कॅमेरे चोरीला
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात वनविभागाचे चार ट्रॅप कॅमेरे चोरीला गेल्याची घटनाही उघडकीस आली आहे. अखिल भारतीय व्याघ्र गणना २०२६ अंतर्गत वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे कॅमेरे लावण्यात आले होते.महागाव बीटमधील बुटाई आणि बोंडगाव/देवी बीटमधील बोदरा जंगल परिसरातून ३ ते ४ नोव्हेंबरदरम्यान हे कॅमेरे चोरीला गेले. चोरी झालेल्या चार कॅमेऱ्यांची एकूण किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.वनरक्षक अमित भिवाजी सहारे यांच्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे नागझिरा अभयारण्याच्या कोर झोनमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यू, तर दुसरीकडे वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या निगराणी कॅमेऱ्यांची चोरी, या घटनांमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघाच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे, हे वनविभागाच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी