सोनिया गांधींवरील भाजप-आरएसएसचा प्रचार खोटा- प्रियांका वाड्रा
नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेसच्या खासदार प्रियांका वाड्रा यांनी गुरुवारी त्यांची आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची जोरदार पाठराखण केली. सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘बिलाँगिंग’ या आत्मचरित्रावरून
माझ्या आईबद्दल भाजप-आरएसएसने आयुष्यभर खोटे बोलले-  प्रियांका गांधी


नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेसच्या खासदार प्रियांका वाड्रा यांनी गुरुवारी त्यांची आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची जोरदार पाठराखण केली. सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘बिलाँगिंग’ या आत्मचरित्रावरून भाजपने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) खोटा प्रचार केल्याचा आरोप केला.

प्रियांका वाड्रा म्हणाल्या की, “सोनिया गांधी यांच्याबद्दल भाजप आणि आरएसएसने आयुष्यभर खोटा प्रचार केला आहे.” भारतात आपल्या आईने आयुष्याचा मोठा काळ व्यतीत केला. या काळात भाजप, आरएसएस आणि अन्य लोकांनी त्यांच्याबद्दल अनेक निराधार आरोप केले. काल्पनिक गोष्टी रचून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या सर्व काळात सोनिया गांधी शांत राहिल्या. आता त्या स्वतःची बाजू मांडत असून, त्यांना आपली कहाणी सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर भाजपने केलेल्या टीकेसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रियांका वाड्रा म्हणाल्या, “इतक्या वर्षांपासून ते माझ्या आईबद्दल खोटे बोलत आले आहेत. आता त्या सत्य सांगत आहेत, तर ते त्यालाही खोटेच म्हणणार, हे साहजिक आहे. याशिवाय ते दुसरे काय बोलू शकतात? मात्र, ते त्यांचे पुस्तक वाचत आहेत, याचा मला खूप आनंद आहे.”

दरम्यान, भाजपने मंगळवारी सोनिया गांधी यांच्यावर त्यांच्या ‘बिलाँगिंग’ या पुस्तकातून १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच, १९८४ मधील शीखविरोधी दंगलींच्या प्रकरणात त्यांचे दिवंगत पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न पुस्तकातून करण्यात आल्याचा दावाही भाजपने केला होता.

भाजपने सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या शीर्षकावरही टीका केली होती. ‘बिलाँगिंग’ऐवजी या पुस्तकाचे नाव ‘व्हाइटवॉशिंग’ म्हणजेच चुका आणि गैरकृत्यांवर पांघरूण घालणे, असे असायला हवे होते, अशी टिप्पणी भाजपने केली होती.

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली असून, प्रियांका वाड्रा यांच्या वक्तव्यामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande