
रत्नागिरी, 12 नोव्हेंबर (हिं.स.) । ‘बेटी बचायो, बेटी पढायो’ अभियानांतर्गत पालगड (ता. दापोली) येथे आदिवासी समाजासाठी बालविवाह प्रतिबंधाबाबत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे पार पडला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत प.पू. साने गुरुजी कलामंदिर सभागृहात हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
आदिवासी समाजामध्ये बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत जागृती निर्माण करून ही अनिष्ट प्रथा पूर्णपणे रोखणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो (POCSO) कायदा आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांविषयी सखोल माहिती देण्यात आली. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत तज्ज्ञांनी प्रबोधन केले. यासोबतच कोणत्याही संकटाच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ आणि महिला हेल्पलाइन १८१ या क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि महिला व बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांनी व मान्यवरांनी “बालविवाह करणार नाही व बालविवाह होऊ देणार नाही” अशी सामुदायिक प्रतिज्ञा घेऊन बालहक्क संरक्षणाचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा संरक्षण अधिकारी (रत्नागिरी-संगमेश्वर) लहू पगडे, संरक्षण अधिकारी (दापोली, खेड, मंडणगड) माणिक कांबळे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संस्थात्मक संरक्षण अधिकारी अनिल गायकवाड, चाइल्ड हेल्पलाइन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे, समुपदेशक ओंकार जाधव, तसेच महाराष्ट्र आदिवासी कातकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठोबा जगताप आणि तालुका सल्लागार कृष्णा हिलम आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी