
छत्रपती संभाजीनगर, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।
विविध जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय उडवून देण्याचा ई-मेल आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणांनी सर्वच न्यायालयांचा परिसर रिकामा केल्याचं दिसून आलं. ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील न्यायालयाला असा धमकीचा ई-मेल आल्याची माहिती असून सर्वच ठिकाणी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अधिक तपास सुरू आहे. सायबर पोलिसांकडूनही ई-मेल पाठवणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात
ठाणे जिल्हा न्यायालयात आयईडी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी ई-मेल द्वारे आज देण्यात आली. त्यानुसार, 27 नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच मेट्रो स्थानकांवर रात्री 9.11 वाजता बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेखही त्यात करण्यात आला आहे. सन 1984 मधील रक्तपाताचा बदला रक्ताने घेण्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये केला आहे. आपण दिलजीत दोसांझ याचा साथीदार असल्याचा उल्लेख करत, 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आरोपीने दिली आहे. “मराठी बांधवांनो, आपल्या मुलांना वाचवा, 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट घडवले जातील.”, अशा आशयाचा मजकूर मेलमध्ये आहे.
मेलमधील माहिती खरी मानून सुरक्षेच्या दृष्टीने आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सांगली न्यायालयातही सुरक्षा वाढवली
सांगली जिल्हा सत्र न्यायालयातही बॉम्ब ठेवला असल्याचा मेल प्राप्त झाला असून बॉम्बने न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या इमारतीच्या तपासणीसाठी आणि सुरक्षितेसाठी सांगली जिल्हा पोलीस दल बॉम्बशोधक आणि एक श्वान पथकासह न्यायालयाच्या इमारतीत दाखल झाले. सर्व न्यायाधीश ,वकील आणि पक्षकार यांना न्यायालयातून तातडीने बाहेर घेण्यात आले. साधारणता दीड वाजता मेल आला असून तीन वाजून 11 मिनिटांनी न्यायालयाची इमारत उडवून देऊ असा उल्लेख मेलमध्ये आहे.
परभणीतही पोलीस यंत्रणा अलर्ट
राज्यातील न्यायव्यवस्थेला हादरवणारी घटना समोर आली असून, परभणीसह राज्यातील बहुतांश जिल्हा न्यायालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. परभणी, हिंगोली, बीड, सांगली आणि ठाणे यासह अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. या धमकीनंतर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, संबंधित जिल्हा न्यायालयांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. परभणीतही पोलिसांकडून तातडीने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परभणीत न्यायालय परिसरात डॉग स्कॉड, बॉम्ब शोधक व नाशक पथकासह पोलिसांची विविध पथके दाखल झाली असून, न्यायालयाच्या परिसराची कसून तपासणी केली जात आहे. धमकीचा ई-मेल नेमका कोणी आणि कुठून पाठवला, याचा तपासही सुरू आहे. दरम्यान, या धमकीमुळे न्यायालयीन परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis