बिहारच्या लखीसरायमध्ये भीषण रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू, चौघांची प्रकृती गंभीर
पाटणा, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात लखीसराय-जमुई मुख्य मार्गावरील गुणसागर गावाजवळ ट्रक आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर एका बालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थान
ACCIDENT LAKHAISARAI BR 05 DEATH


पाटणा, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात लखीसराय-जमुई मुख्य मार्गावरील गुणसागर गावाजवळ ट्रक आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर एका बालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना मोठ्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले.

हा अपघात तेतरहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. प्राथमिक माहितीनुसार, पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथील रहिवासी असलेले स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी झारखंडच्या दिशेने जात होते. याचदरम्यान गुणसागर गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली. या धडकेत स्कॉर्पिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहनातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तेतरहाट पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत व बचावकार्य सुरू केले. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर चारही जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने लखीसराय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृतांमध्ये दोन महिला, एक बालक आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यापैकी एक जण एसयूव्ही चालवत होता. मृतांची ओळख राकेश गुप्ता (३८), मीना देवी (५०), पल्लवी कुमारी (२८) आणि बादल कुमार (१०) अशी पटली आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असून, पूर्व चंपारण जिल्ह्यातील ढाका गावचे रहिवासी होते. तर वाहनचालकाची ओळख जफर आलम (४५) अशी पटली आहे.

रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असून, चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये एका बालकाचाही समावेश आहे. अपघातात मृत्यू झालेल्या पाचही जणांचे मृतदेहदेखील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तेतरहाट पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी इलू उपाध्याय यांनी सांगितले की, स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी मोतिहारी येथून देवघरला जात होते. याचदरम्यान समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकची त्यांच्या वाहनाला धडक बसली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. तर लखीसरायचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) प्रभाकर कुमार यांनी सांगितले की, अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याची माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande