संशयालाच मानले सत्य; बेबी मडावीची निर्घृण हत्या!
निर्दोष असल्याची कबुली खुद्द नक्षलवाद्यांनीच दिली अंतर्गत दस्तऐवजांतून हत्येचे वास्तव उघड इरपना (गडचिरोली) 24 नोव्हेंबर (हिं.स.) : जिच्या हातात बंदुकीऐवजी पुस्तक होते, डोळ्यांत स्वतःच्या समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न होते आणि दुर्गम आदिवास
बेबीचे वडील गंगाजुजा मडावी आणि आई सोमी मडावी


निर्दोष असल्याची कबुली खुद्द नक्षलवाद्यांनीच दिली

अंतर्गत दस्तऐवजांतून हत्येचे वास्तव उघड

इरपना (गडचिरोली) 24 नोव्हेंबर (हिं.स.) : जिच्या हातात बंदुकीऐवजी पुस्तक होते, डोळ्यांत स्वतःच्या समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न होते आणि दुर्गम आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची धडपड होती, त्याच बेबी मडावीचा नक्षलवाद्यांनी केवळ संशयाच्या आधारे जीव घेतला. पोलिसांची खबरी असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसताना ६ ऑक्टोबर २०१८ रोजी तिची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, पुढे खुद्द नक्षलवादी संघटनेच्या अंतर्गत दस्तऐवजांतून बेबीवरील संशय निराधार असल्याचे आणि तिची हत्या करणे चुकीचे ठरल्याचे मान्य करण्यात आले. जिवंतपणी जिच्या स्वप्नांना संशयाच्या गोळीने संपवले, तिचे निर्दोषत्व मात्र मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्याच कागदपत्रांतून सिद्ध झाले. आजही मुलगी गमावलेल्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांतील वेदना या क्रूर वास्तवाची मूक साक्ष देत आहेत.

दोन एकर शेतीतून पुण्यापर्यंतचा शिक्षणप्रवास

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम इरपना गावात गंगाजुजा आणि सोमी मडावी या कष्टकरी दाम्पत्याच्या पोटी बेबीचा जन्म झाला. अवघी दोन एकर शेती, बेताची आर्थिक परिस्थिती आणि संघर्षमय जीवन असे तिच्या कुटुंबाचे वास्तव होते. मात्र, परिस्थितीसमोर हार न मानता शिक्षणाच्या बळावर आयुष्य बदलण्याची जिद्द बेबीने बाळगली. अभ्यासातील गुणवत्ता आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या ध्यासातून तिने पुणे गाठले आणि तेथे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले.

स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण करतानाच बेबीने आपल्या समाजासाठीही काहीतरी करण्याचा निर्धार केला होता. शिक्षणामुळे माणसाचे आयुष्य बदलू शकते, याचा अनुभव तिने घेतला होता. हाच अनुभव आपल्या गावातील आणि परिसरातील आदिवासी मुलांपर्यंत पोहोचवण्याची तिची धडपड सुरू होती.

गावोगावी जाऊन शिक्षणाची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न

बेबीची स्वप्ने केवळ स्वतःच्या प्रगतीपुरती मर्यादित नव्हती. इरपना, बिनागुंडा, गोगुलपार, गोंगवाडा आणि कावंडे परिसरातील आदिवासी कुटुंबांशी ती संवाद साधत असे. मुलांनी शिकावे, उच्च शिक्षण घ्यावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि समाजाने विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी ती प्रयत्नशील होती.दुर्गम भागातील मुलांसमोर शिक्षणाच्या माध्यमातून नव्या संधींचे क्षितिज खुले व्हावे, ही तिची तळमळ होती. मात्र, विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या याच तरुणीच्या वाट्याला संशयातून मृत्यू आला.

रामकोच्या आदेशाने संपवले आयुष्य

नक्षलवाद्यांनी ६ ऑक्टोबर २०१८ रोजी कावंडे गावाजवळ बेबीला ताब्यात घेतले. ती पोलिसांची खबरी असल्याचा संशय तिच्यावर घेण्यात आला. मात्र, या आरोपाची ठोस खातरजमा न करताच तिच्या हत्येचा आदेश देण्यात आल्याचे पुढे तपासात समोर आले.

कमला मंकू नरोटे ऊर्फ रामको हिने हा आदेश दिला होता. ती भाकप (माओवादी) संघटनेच्या गडचिरोली विभागीय समितीची सदस्य आणि गट्टा दलमची कमांडर होती. संघटनेतील वरिष्ठ पदावरील प्रभावामुळे तिचा निर्णय अंतिम मानला जात असल्याचे सांगितले जाते. संशय निर्माण झाला की त्याची सत्यता पडताळण्याऐवजी संशयालाच अंतिम सत्य मानून कारवाई करण्याची पद्धत या घटनेतून समोर आली.

मृत्यूनंतर बेबीला मिळाली निर्दोषत्वाची कबुली

बेबीच्या हत्येनंतर वर्षभराच्या आत रामको नरोटे पोलिस चकमकीत ठार झाली. त्यानंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या नक्षलवादी संघटनेच्या कागदपत्रांच्या तपासणीत बेबीच्या हत्येमागील आदेश रामकोने दिल्याचे उघड झाले. मात्र, या कागदपत्रांतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे बेबीच्या हत्येबाबत खुद्द संघटनेनेच नंतर व्यक्त केलेली भूमिका होय.नक्षलवादी संघटनेच्या अंतर्गत आढाव्यात बेबीला केवळ संशयावरून ठार मारणे चुकीचे होते, असे नमूद करण्यात आले होते. तिच्या आरोपांची खातरजमा न करता हत्या करण्याऐवजी तिला आई-वडिलांकडे परत पाठवायला हवे होते, अशी कबुलीही या दस्तऐवजांतून समोर आली. ज्या संशयाच्या आधारे एका तरुणीचे आयुष्य संपवण्यात आले, तोच संशय निराधार असल्याचे संघटनेच्या अंतर्गत नोंदीतून मान्य झाले. मात्र, ही कबुली बेबीला पुन्हा जिवंत करू शकत नव्हती.

तीन लाखांची मदत; पण आई-वडिलांच्या वेदनांचे काय ?

बेबीच्या हत्येनंतर शासनाने तिच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. तिची बहीण सुनीता मडावी हिला पोलिस दलात सामावून घेण्यात आले. शासनाकडून मदतीचा हात मिळाला, कुटुंबातील एका सदस्याला रोजगारही मिळाला; मात्र मुलगी गमावलेल्या वृद्ध आई-वडिलांच्या आयुष्यातील पोकळी भरून निघाली नाही.ज्या मुलीने आपल्या कष्टकरी कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्याचे स्वप्न पाहिले होते, जिच्या शिक्षणामुळे आई-वडिलांच्या आयुष्याला नवी आशा मिळाली होती, तीच मुलगी त्यांच्यापासून कायमची हिरावली गेली. आजही बेबीच्या आठवणींनी या वृद्ध दाम्पत्याचे डोळे पाणावतात. आर्थिक मदत मिळू शकते, नोकरी मिळू शकते; पण लेकरू गमावलेल्या आई-वडिलांच्या काळजातील वेदना कोणतीही भरपाई मिटवू शकत नाही.

वैचारिक नक्षलवादाचा धोका कायम

आजघडीला गडचिरोलीत सशस्त्र नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र असले, तरी वैचारिक पातळीवरील नक्षलवादी प्रभावाबाबत नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. इरपना गावातील तरुणांशी झालेल्या संवादातून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांच्या मनात शासन आणि प्रशासनाविषयी नकारात्मक भावना निर्माण करण्याचे प्रयत्न विविध माध्यमांतून होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर तथाकथित अर्बन नक्षलवाद आणि वैचारिक पातळीवरील नक्षलवादी प्रभाव यांविषयीही चर्चा सुरू झाली आहे.

बंदुकीच्या जोरावर विकासाला रोखणाऱ्या नक्षलवादाचे आव्हान आता वैचारिक पातळीवरही तपासण्याची गरज आहे. आदिवासी तरुणांच्या हातात बंदुकीऐवजी पुस्तक, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी पोहोचणे हीच या भागाच्या शाश्वत विकासाची खरी गुरुकिल्ली आहे. बेबी मडावीने याच परिवर्तनाची वाट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तिची हत्या करणारे नक्षलवादी संपले असतील; मात्र बेबीने पाहिलेले शिक्षित, स्वावलंबी आणि विकसित आदिवासी समाजाचे स्वप्न जिवंत ठेवणे, हीच तिच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली ठरेल.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande