म्हाडा मुख्यालयाच्या संरक्षक भिंतींवर विद्यार्थ्यांच्या कलाकृती साकारणार
''म्हाडा ओपन गॅलेरी २०२६'' उपक्रमातून सार्वजनिक जागांचे कलात्मक सुशोभीकरण; कला, पर्यावरण आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्र
म्हाडा


* 'म्हाडा ओपन गॅलेरी २०२६' उपक्रमातून सार्वजनिक जागांचे कलात्मक सुशोभीकरण; कला, पर्यावरण आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन

मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सार्वजनिक जागांचे कलात्मक सुशोभीकरण, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने म्हाडातर्फे 'म्हाडा ओपन गॅलेरी २०२६' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत दि. २८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत म्हाडा मुख्यालयाच्या दर्शनी संरक्षक भिंतींवर चित्रकला व वास्तुविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात येणार आहेत.

राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांना एकत्र आणत दि. ५ डिसेंबर १९७७ रोजी स्थापन झालेल्या म्हाडाने गेल्या पाच दशकांच्या वाटचालीत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी, लोककल्याण आणि शाश्वत गृहनिर्माण विकासाला प्राधान्य दिले आहे. म्हाडाच्या या गौरवशाली वाटचालीला कलात्मक आणि सामाजिक उपक्रमांची जोड देण्याच्या दृष्टिकोनातून ‘गृहनिर्माण आनंद निर्देशांक’(Housing Happiness Index – HHI)अंतर्गत 'म्हाडा ओपन गॅलेरी २०२६' हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

'म्हाडा ओपन गॅलेरी २०२६' हा उपक्रम केवळ म्हाडा मुख्यालयाच्या भिंतींचे सुशोभीकरण करण्यापुरता मर्यादित नसून, सार्वजनिक जागांना सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि सामुदायिक सहभागाचे व्यासपीठ बनविण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात म्हाडाच्या विविध गृहनिर्माण वसाहतींमध्येही अशा प्रकारचे कलात्मक उपक्रम राबविण्याची संकल्पना आहे. कला, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांच्या समन्वयातून गृहनिर्माण परिसर अधिक सुंदर, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आनंददायी बनविणे, तसेच नागरिकांमध्ये आपल्या परिसराविषयी आपलेपणा आणि सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमामागील व्यापक दृष्टिकोन आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हाडाच्या गृहनिर्माण वसाहती आणि सार्वजनिक जागांना अर्थपूर्ण, आकर्षक आणि नागरिकांच्या भावनिक जिव्हाळ्याशी जोडलेली कलात्मक स्थळे म्हणून विकसित करणे हा आहे. कला माध्यमातून सामाजिक समावेशकता, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सांस्कृतिक ओळख, शिक्षण, कौशल्य विकास आणि सामुदायिक सहभाग या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

'म्हाडा ओपन गॅलेरी २०२६' उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना आठ संकल्पनाधारित विषय देण्यात आले आहेत. यामध्ये भविष्याभिमुख घरे व सक्षम समुदाय, जलसाक्षर समुदाय, सशक्त सामायिक सार्वजनिक जागा, स्वच्छ समुदाय व निरोगी भविष्य, समुदायजीवनातील संस्कृती व परंपरा, कौशल्य विकास व आर्थिक संधी, हरित जीवनशैली व शाश्वत समुदाय तसेच शिक्षण, प्रगती आणि सामूहिक विकास या विषयांचा समावेश आहे. या संकल्पनांशी सुसंगत भित्तिचित्रे साकारताना विद्यार्थ्यांना सामाजिक समावेशकता, महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, पर्यावरण, पाणी संवर्धन, वृक्षारोपण, पुनर्वापर, सांस्कृतिक वारसा, शिक्षण आणि क्रीडा अशा विविध विषयांचे कलात्मक सादरीकरण करता येणार आहे. केवळ सजावटीपुरती चित्रे न साकारता त्यातून सामाजिक संदेश आणि सकारात्मक विचार व्यक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे.

'म्हाडा ओपन गॅलेरी २०२६' या उपक्रमात रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्स, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (VESCOA) आणि सीटीईएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या तीन शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रत्येक संस्थेतील विद्यार्थ्यांचे चार ते सहा सदस्यांचे गट तयार करण्यात येणार असून, संबंधित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली भित्तिचित्रांची संकल्पना, रचना आणि प्रत्यक्ष निर्मिती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संकल्पनांचे म्हाडामार्फत परीक्षण व मान्यता घेऊनच प्रत्यक्ष चित्रनिर्मिती करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande