
लातूर, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला लातूर जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, पीडितेशी विवाह केल्यानंतरही आरोपीची गुन्ह्यातून सुटका झाली नाही. विवाह आणि अपत्य जन्माचा बचाव पुढे करून शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले. या खटल्यात १४ साक्षीदारांची साक्ष निर्णायक ठरली.
विपुल सखाराम बनकर (वय ३५, रा. म्हाडा कॉलनी, लातूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
२६ सप्टेंबर २०१५ रोजी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी येथे आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २११/२०१५ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३६६-अ, ३७६(२)(एन) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. ए. पडवळ यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सरकारी पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, न्यायालयात पीडितेची साक्ष झाल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत विवाह केला. त्यानंतर पीडितेची पुन्हा साक्ष नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळला. पुढे विवाह आणि अपत्य जन्माचा आधार घेत आरोपीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडिता आणि आरोपी एकत्र राहत नसून त्यांच्यात वैवाहिक वाद असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. अभियोग पक्षाने आरोपीचा बचाव खोटा असल्याचे पुराव्यांसह मांडले.
सरकारी अभियोक्ता एस. एम. मुंदडा आणि विशेष सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि उपलब्ध पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्याच्या यशस्वी कामकाजासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. मनाळे, पोलीस अंमलदार चंद्रकांत राचमाळे, गोविंद बिराजदार, महिला पोलीस अंमलदार पकाले आणि काळे यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis