
पसंती क्रमांकासाठी ६ नोव्हेंबरपासून अर्ज
पुणे, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे चारचाकी वाहनांसाठी MH61 या संकेतांकांतर्गत नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांचे अर्ज शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत.
इच्छुक वाहनधारकांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नवीन नोंदणी विभागात जमा कराव्यात. डिमांड ड्राफ्ट 'R.T.O., Pune' यांच्या नावे पुणे येथील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असणे आवश्यक आहे.
एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास लिलाव
एखाद्या पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांना लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. लिलावासाठी अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट सीलबंद लिफाफ्यात शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत जमा करावा लागेल.
लिलाव प्रक्रिया त्याच दिवशी दुपारी ३ वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहकार सभागृहात पार पडणार आहे. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सुधारित शुल्कानुसार आकारणी
पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठी शासनाच्या ३० ऑगस्ट २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सुधारित शुल्क लागू राहणार आहे. लिलाव प्रक्रियेत समान रकमेचे डिमांड ड्राफ्ट प्राप्त झाल्यास चिठ्ठीद्वारे संबंधित नोंदणी क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे.
नागरिकांनी निर्धारित वेळेत अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु