
एकूण २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण
पुणे, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने २५ हजार एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन केले आहे. यासाठी मका आणि कडवळ या चारा पिकांच्या बियाण्यांचे वाटप युद्धपातळीवर सुरू असून, महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून प्राप्त झालेल्या २२० टन बियाण्यांपैकी आतापर्यंत ८० टक्के बियाण्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित बियाणे पुढील आठवडाभरात प्राप्त होणार असून त्याचेही पशुपालक शेतकऱ्यांना तातडीने वाटप करण्यात येणार आहे.
चारा लागवडीसाठी मका आणि कडवळ या पिकांच्या बियाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत नोंदणीकृत पशुपालक शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण केले जात आहे. उर्वरित बियाणे प्राप्त होताच त्याचे वितरण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. अधिकाधिक क्षेत्रावर चारा उत्पादन घेऊन आगामी टंचाईच्या काळात पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
मुरघास निर्मिती आणि चारा संवर्धनाचे प्रशिक्षण
चारा लागवडीबरोबरच चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि संवर्धन करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहभागातून चारा साक्षरता प्रशिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करून पशुपालकांना चारा नियोजन, उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास निर्मिती तसेच भविष्यातील टंचाईच्या काळासाठी चारा साठवणूक व संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
अझोला उत्पादनासह युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक
कार्यशाळांमध्ये पर्यायी चारा स्रोत म्हणून अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. तसेच वाढलेल्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे आणि सकस चारा तयार करण्याचे तंत्रही पशुपालकांना समजावून सांगितले जात आहे. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पशुपालकांचे नियमित प्रबोधन केले जात आहे. या उपाययोजनांमुळे पशुधनाचे आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य
शासनाच्या नवीन धोरणानुसार अधिकाधिक चारा उत्पादनावर लक्ष केंद्रित करून जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजेश कुमार वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे वितरण, चारा लागवड, चारा संवर्धन आणि पशुपालक प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.
संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुधनाला पुरेसा आणि सकस चारा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु