दिवाळीत मेळघाटच्या आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल; एसटीच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे जीवाचा धोका पत्करून खासगी बसने प्रवास
अमरावती, 05 नोव्हेंबर, (हिं.स.)। दिवाळीचा सण जवळ आल्याने चाकरमानी आणि विद्यार्थी आपल्या गावी परतत आहेत. मात्र, अमरावती बस स्थानकावर मेळघाटमधील आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी वेळेवर एसटी बस
दिवाळीत मेळघाटच्या आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल; एसटीच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे जीवाचा धोका पत्करून खासगी बसने प्रवास


अमरावती, 05 नोव्हेंबर, (हिं.स.)। दिवाळीचा सण जवळ आल्याने चाकरमानी आणि विद्यार्थी आपल्या गावी परतत आहेत. मात्र, अमरावती बस स्थानकावर मेळघाटमधील आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना बस स्थानकावरच ताटकळत बसावे लागत आहे. अमरावती बस स्थानक परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमली असून, एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वेळेवर बस मिळत नसल्याने आणि गावी जाण्याची ओढ लागल्याने या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, बसगाड्या उपलब्ध नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना नाइलाजास्तव आपला जीव धोक्यात घालून धोकादायक पद्धतीने खासगी वाहनांमधून व बसेसमधून प्रवास करावा लागत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून चालणाऱ्या या खासगी वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सणाच्या काळात विद्यार्थ्यांची होणारी ही परवड थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने तातडीने अतिरिक्त बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी आक्रमक मागणी मेळघाटमधील त्रस्त विद्यार्थ्यांमधून केली जात आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तात्काळ अतिरिक्त बसची व्यवस्था करावी, जेणेकरून हे विद्यार्थी सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचू शकतील.

--------------------------------------------------------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande