दिवाळीसाठी रत्नागिरी विभागाकडून एसटीच्या जादा २६ फेऱ्या
रत्नागिरी, 07 नोव्हेंबर (हिं.स.) । दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या रत्नागिरी विभागाने येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत लांब व मध्यम पल्ल्याच्या विविध मार्गांवर दररोज २६ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त मुंबई, पु
एसटी


रत्नागिरी, 07 नोव्हेंबर (हिं.स.) । दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या रत्नागिरी विभागाने येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत लांब व मध्यम पल्ल्याच्या विविध मार्गांवर दररोज २६ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीनिमित्त मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, धुळे, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या आणि तेथून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. ही गर्दी सुरळीत हाताळण्यासाठी नियमित फेऱ्यांबरोबरच या २६ दैनंदिन जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या सर्व फेऱ्यांचे संगणकीय आरक्षण सुरू करण्यात आले असून प्रवाशांना बसस्थानकावरील आरक्षण खिडकीवर, अधिकृत खासगी एजंटमार्फत अथवा एसटीच्या मोबाइल ॲपवरून आगाऊ तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जादा फेऱ्यांचा मार्ग आणि वेळांचे नियोजन असे :

दापोली ते छत्रपती संभाजीनगर पहाटे ५.३०, परतीच्या वेळी स. ६.३०

दापोली ते परळी पहाटे ५.००, परतीच्या वेळी स. ६.३०

खेड ते चिंचवड दुपारी १३.३० परतीसाठी रात्री २२.३०)

खेड ते विरार रात्री २०.३०, परतीसाठी रात्री २०.३०

खेड ते बोरिवली दुपारी १५.००, परतीसाठी दुपारी १५.००

खेड ते बोरिवली रात्री २२.१५, परतीसाठी रात्री २२.१५

खेड ते नांदेड पहाटे ५.३०, परतीसाठी स. १०.००

खेड ते बीड संध्याकाळी १८.००, परतीसाठी दुपारी १२.३०

चिपळूण ते पुणे (ताम्हाणी मार्गे) पहाटे ५.३०, परतीसाठी दुपारी १३.००

चिपळूण ते स्वारगेट दुपारी १२.००, परतीसाठी रात्री २२.००

चिपळूण ते ठाणे स. ९.३०, परतीसाठी रात्री २१.३०

चिपळूण ते मुंबई स. ११.३०, परतीसाठी रात्री २२.३०

चिपळूण ते बोरिवली स. ९.००, परतीसाठी रात्री २०.४५

चिपळूण ते बोरिवली स. १०.३०, परतीसाठी रात्री २१.३०

देवरूख ते स्वारगेट (चिपळूण मार्गे) स. ९.३०, परतीसाठी रात्री २१.१५

देवरूख ते नाशिक (पुणे मार्गे) स. ११.००, परतीसाठी स. ८.३०

रत्नागिरी ते पंढरपूर स. ६.४५, परतीसाठी रात्री १९.३०

रत्नागिरी ते पंढरपूर सायंकाळी १९.३०, परतीसाठी स. ६.४५

रत्नागिरी ते पुणे (कोल्हापूर मार्गे) पहाटे ५.१५, परतीसाठी रात्री १९.००

रत्नागिरी ते पुणे सायंकाळी १९.००, परतीसाठी पहाटे ५.१५)

लांजा ते कोल्हापूर (रत्नागिरी मार्गे) स. १०.४५, परतीसाठी सायंकाळी १६.३०

लांजा ते धाराशिव संध्याकाळी १७.००, परतीसाठी सायंकाळी १६.००

लांजा ते बोरिवली स. ६.३०, परतीसाठी पहाटे ५.००

राजापूर - रत्नागिरी ते कोल्हापूर स. ७.४५ , परतीसाठी दुपारी १५.३०

मंडणगड ते छत्रपती संभाजीनगर (पुणे मार्गे) स. ७.४५, परतीसाठी स. ८.४५

मंडणगड ते बोरिवली दुपारी १२.००, परतीसाठी रात्री २०.३०

एसटी महामंडळाने १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला प्रवाशांना तिकिटातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' अनिवार्य केले होते. मात्र, सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ही अनिवार्य अट शिथिल करण्यात आली आहे. आजपासून हा निर्णय लागू करण्यात आला असून, आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत महिला सवलतधारक प्रवाशांना कार्डशिवायही सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी विभागून सुरक्षित व वेळेवर प्रवास व्हावा, यासाठी प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून महामंडळाच्या या जादा फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande