
रत्नागिरी, 07 नोव्हेंबर (हिं.स.) । कांटे (ता. लांजा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रार्थना सचिन देसाई यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आयडॉल शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न, शाळेच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल या निवडीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शाळेत कार्यरत असताना राज्यस्तरावर मिळालेली ही संधी कांटे गावासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे.
या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी सोनवले, विस्तार अधिकारी कडव, सावंग व पांचाळ, केंद्रप्रमुख सुवरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रज्ञा लोंढे, सरपंच कुष्टे, ग्रामसेविका भडाळे, पोलीसपाटील पाध्ये तसेच कांटे येथील ग्रामस्थांनी प्रार्थना देसाई यांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील शाळेचा नावलौकिक राज्यस्तरावर पोहोचविणाऱ्या या यशाबद्दल कांटे परिसरातून समाधान व्यक्त होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी