एडव्हांटेज विदर्भ 2026’ 6 फेब्रुवारी पासून
नागपूर, 4 फेब्रुवारी (हिं. स.) : असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘एडव्हांटेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सव’च्या तिसऱ्या आवृत्तीचे भव्य उद्घाटन शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता
एडव्हांटेज विदर्भचे अध्यक्ष आशिष काळे व इतर मान्यवर


नागपूर, 4 फेब्रुवारी (हिं. स.) : असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘एडव्हांटेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सव’च्या तिसऱ्या आवृत्तीचे भव्य उद्घाटन शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, अंबाझरी–अमरावती मार्ग, नागपूर येथे होणार आहे. विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती देणारा हा तीन दिवसीय महोत्सव “एम्पॉवरिंग ग्रोथ” या संकल्पनेवर आधारित आहे.

उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री व या महोत्सवाचे प्रवर्तक नितीन गडकरी भूषवणार असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्य व केंद्र सरकारमधील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रोजगार मंत्री आकाश फुंडकर, वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर तसेच उद्योग व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा त्यामध्ये समावेश आहे.

या महोत्सवात देशातील नामवंत उद्योगपतीही सहभागी होणार आहेत. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बालसुब्रमण्यम प्रभाकरन, अदानी समूहाचे संचालक श्री. जीत अदानी, महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक श्री. राजेश जेजुरीकर, पर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जीन टोबूल यांच्यासह उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन (आयएएस) आणि मुख्यमंत्री यांचे सल्लागार श्री. कौस्तुभ धवसे यांची उपस्थिती विशेष ठरणार आहे.

एडव्हांटेज विदर्भ 2026चे प्रमुख आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद (इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह). या परिषदेत 23 हून अधिक देशांचे राजदूत व व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार असून संरक्षण, अन्नप्रक्रिया, दुग्ध व मत्स्य व्यवसाय, शिक्षण, स्टार्टअप्स, नवकल्पना, लॉजिस्टिक्स, पर्यटन, पोलाद, औषधनिर्मिती आदी क्षेत्रांवरील तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

औद्योगिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. 6 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध गायिका श्रीनिधी घटाटे यांचा लाईव्ह कॉन्सर्ट, 7 फेब्रुवारी रोजी फॅशन शो, तर 8 फेब्रुवारी रोजी ‘सितार सिम्फनी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. गेमिंग झोन, नागपूर फूड फेस्टिव्हल, ई-व्ही एक्स्पो आणि भव्य ड्रोन शो हीही विशेष आकर्षणे असतील.

महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून, जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी सर्व सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत. ही माहिती AID चे अध्यक्ष आशीष काळे यांनी आयोजित दिली.

______________

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande