
चंद्रपूर, ४ फेब्रुवारी (हिं.स.) : अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात ४० गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन भत्ता, शैक्षणिक आकस्मिक खर्च, विमान प्रवास, व्हिसा शुल्क व आरोग्य विमा यांसारखे खर्च वावरण्यास मदत केली जाईल. शैक्षणिक आकस्मिक खर्च युएस व इतर देशांसाठी 1500 युएस डॉलर, तर युकेसाठी 1100 जीबीपी इतका दरवर्षी दिला जाणार आहे.
शिष्यवृत्तीस पात्र होण्यासाठी:
विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा 35 वर्ष, पीएचडीसाठी 40 वर्षे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये (विद्यार्थी उपलब्ध नसल्यास १० लाख रुपये पर्यंत शिथिलता).
विद्यापीठाची QS World Ranking 200 च्या आत (शिथिल केल्यास 300 पर्यंत).
TOEFL किंवा IELTS यासारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक.
अर्ज करण्यासाठी विद्यार्थी https://fs.maharashtra.gov.in
या अधिकृत संकेतस्थळावरून फक्त ऑनलाइन अर्ज भरू शकतात. निवड समितीद्वारे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी विद्यार्थ्यांना तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या योजनेमुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षण घेण्यास मोठा हातभार मिळणार आहे.
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव