
लातूर, 04 फेब्रुवारी (हिं.स.)।
लातूर आणि बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका सामान्य अवलियाची आता बॉलिवूडमध्ये दिमाखदार एन्ट्री झाली आहे. अहमदपूर येथील पत्रकार, शिक्षक तथा व्यावसायिक रुद्रा मुरकुटे हे येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मुरकुटवाडीचा सुपुत्र बॉलिवूडच्या पडद्यावर
मूळचे मुरकुटवाडी (उजनी पाटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील रहिवासी असलेले आणि अहमदपूर (जि. लातूर) ही आपली कर्मभूमी मानणारे रुद्रा मुरकुटे यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात राजस्थानच्या वाळवंटात या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले होते.
नकारात्मक भूमिकेतून उमटवणार ठसा
या चित्रपटात रुद्रा मुरकुटे यांनी एका 'नेगेटिव्ह' भूमिकेत म्हणजेच गुंडाचे पात्र साकारले आहे. 'बाहुबली' फेम प्रभाकर (कालकेय) यांनी मुख्य खलनायकाची भूमिका साकारली असून, त्यांचे उजवे हात असलेल्या 'रामा रेड्डी' या पात्रात रुद्रा मुरकुटे दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या मित्रपरिवारात आणि अहमदपूर परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
देशभक्ती आणि कौटुंबिक संघर्षाची गाथा
द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन या चित्रपटाची कथा एका सैनिकाच्या आयुष्यावर आधारित आहे. देशसेवा बजावत असताना सैनिकाच्या कुटुंबाला गावगुंडांकडून होणारा त्रास आणि पुलवामा हल्ल्याचा संदर्भ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. चित्रपटाचे निर्माते आणि मुख्य अभिनेता नय्यूम खान असून, अनुभवी दिग्दर्शक बाबू भट्ट यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
तगडी स्टारकास्ट आणि मराठमोळे कलाकार
या चित्रपटात बॉलिवूड आणि साऊथचे दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. यात गोविंद नामदेव, शहाबाज खान, मनोज जोशी, मुकेश भट्ट, ज्ञान प्रकाश, अबोली बागल यांसह अनेक कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड आणि लातूर येथील अनेक कलाकारांना यात संधी मिळाली आहे.
ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती
१९ जानेवारी रोजी मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, यूट्यूबवर (https://youtu.be/X22bFaYMRaI) याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ६ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट भारतभर प्रदर्शित होणार असून, अहमदपूरच्या सुपुत्राला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis