
रायगड, 04 फेब्रुवारी (हिं.स.)।
कर्जत तालुक्यातील शेलू परिसरात सोलर पंप चोरीची पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली असून अज्ञात चोरट्यांनी शेतातील सोलर मोटार आणि विद्युत वायर लंपास करत नेरळ पोलिसांनाच जणू थेट आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे याच भागात यापूर्वी अशाच प्रकारची चोरी झाली होती आणि त्यावेळी पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यात यश मिळवले होते. मात्र पुन्हा त्याच पद्धतीने चोरी झाल्याने नवी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा रंगली आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शेलू, उल्हास नदी किनारी असलेल्या शेतातून दिनांक २४ जानेवारी रोजी सायं. ४:३० ते २५ जानेवारी रोजी सायं. ४:३० या कालावधीत ही चोरी घडली. फिर्यादी यांच्या शेतातील शक्ती सोलर कंपनीची ३ एच.पी. क्षमतेची पाण्याची मोटार आणि कंट्रोलरला जोडलेली सुमारे ३० मीटर लांबीची विद्युत वायर चोरट्यांनी हुशारीने कापून नेल्याचे उघड झाले आहे.
घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून “आता शेतही सुरक्षित नाही का?” असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उनि. काजरोळकर करीत आहेत. वारंवार होत असलेल्या अशा चोरीमुळे पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी व रात्रीची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके