
काठमांडू, ७ फेब्रुवारी, (हिं.स)। नेपाळी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अचानक खालावल्यानंतर उपचारासाठी दाखल केले असताना थापाथली, काठमांडू येथील नॉर्विक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयाचे अध्यक्ष राजेंद्र बहादूर सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
सुनील थापा यांना रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तातडीने हृदयाची विद्युत तपासणी (ईसीजी) करण्यात आली. तपासणीत त्यांचे निधन झाल्याची पुष्टी झाली. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
“रुग्णालयात आणले तेव्हा ते बेशुद्ध होते. तत्काळ ईसीजी तपासणी करण्यात आली आणि त्यातून मृत्यूची खात्री झाली,” असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
नेपाळी चित्रपटसृष्टीतील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सुनील थापा यांनी अनेक दशकांची दीर्घ आणि समृद्ध कारकीर्द गाजवली. नेपाळी, हिंदी (बॉलिवूड) आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांनी ३०० पेक्षा अधिक नेपाळी चित्रपटांत भूमिका साकारल्या. ‘चिनो’ या चित्रपटातील ‘रेटे काइला’ ही त्यांची गाजलेली भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. या भूमिकेमुळे ते नेपाळी सिनेमातील सर्वाधिक मागणी असलेल्या खलनायकांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले.
भारतीय प्रेक्षकांमध्ये ते प्रामुख्याने ‘मेरी कॉम’ या प्रशंसित चरित्रपटातील बॉक्सर मेरी कॉम यांच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमुळे परिचित होते. त्यांच्या निधनामुळे नेपाळी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकार व चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर