
अमरावती, 08 फेब्रुवारी (हिं.स.)शहरात अवैध शस्त्रांची तस्करी आणि वापर करणा-यांविरोधात शहर पोलिसांनी कंबर कसली असून, गुन्हे शाखेने शनिवारी एक मोठी कारवाई केली आहे. बडनेरा परिसरात दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे कट्टे 'पिस्तूल' आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी शहरातील अवैध शस्त्रधारकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गस्त घालत होते. यादरम्यान गुप्त बातमीदाराकडून बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवाजी नगर परिसरातील रेल्वे लाईनकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर दोन तरुण कमरेला शस्त्र लावून संशयास्पद रित्या फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे ट्रॅप रचण्यात आला.
याप्रकरणी संबंधित दोन्ही विधीसंघर्ष बालकांविरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, रमेश धुमाळ, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी