
छत्रपती संभाजीनगर, 11 मार्च (हिं.स.)।
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जाहिरातीनुसार जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या अंतर्गत हिंगोली शहरातील ७ केंद्रे तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रिक्त असलेल्या ४२३ केंद्रांसह एकूण ४३० आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती.
या प्रक्रियेनुसार प्राप्त झालेल्या एकूण ३१०१ अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या १८६१ उमेदवारांच्या मुलाखती दि. ०३ फेब्रुवारी २०२६ ते दि. १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या.
आपले सरकार सेवा केंद्राकरिता घेण्यात आलेल्या या मुलाखत प्रक्रियेचा अंतिम निकाल दि. ०९ मार्च २०२६ रोजी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://hingoli.nic.in/) जाहीर करण्यात आला आहे. या निकालानंतर पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ज्या उमेदवारांना गुणदान करण्यात आलेले नाही, अशा उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरूपात विनंती करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम संधी देण्याची मागणी केली होती.
या विनंतीची सहानुभूतीपूर्वक दखल घेत जिल्हा प्रशासनाने संबंधित उमेदवारांना त्यांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टीफिकेट) जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यासाठी दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांनी केवळ पदवीचे मूळ प्रमाणपत्र (डिग्री सर्टीफिकेट) सादर करणे आवश्यक असून उत्तीर्ण प्रमाणपत्र (पासिंग सर्टीफिकेट) किंवा प्रोव्हीजनल डिग्री सर्टीफिकेट यांचा विचार केला जाणार नाही. निर्धारित मुदतीनंतर सादर केलेल्या प्रमाणपत्रांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी गंभीर नोंद घ्यावी.
तसेच आपले सरकार सेवा केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांच्या रहिवास व शैक्षणिक अर्हतेबाबत इतर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी आपले आक्षेप दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही.
उमेदवारांनी सादर केलेल्या पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्रांच्या आधारे गुणदान करण्यात आल्यानंतर गुणवत्ता यादीत बदल होण्याची शक्यता आहे. तसेच प्राप्त आक्षेपांच्या आधारेही गुणवत्ता यादीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दि. ०९ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादी ही तात्पुरती असून, कागदपत्र पडताळणीनंतर काही उमेदवारांच्या गुणांमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलण्याची अथवा काही उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्रांची अंतिम गुणवत्ता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://hingoli.nic.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, यापूर्वी जाहीर करण्यात आलेला तात्पुरत्या निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचा दि. १२ मार्च २०२६ ते १८ मार्च २०२६ दरम्यानचा कार्यक्रम रद्द करण्यात आला
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis