
हिंगोली, 11 मार्च (हिं.स.)।
जिल्ह्यात वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनचालक व वाहनमालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वाहन तपासणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मौजे जामवाडी, औंढा–हिंगोली रोड, देवळा पाटी जवळील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे दि. 12 मार्च 2026 पासून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनांची प्रत्यक्ष तपासणी सकाळी 7.30 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात येणार आहे. दुपारी 1 नंतर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार नाही. मात्र त्या वेळेनंतर संबंधित वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी तसेच वाहनप्रणालीवरील इतर कामकाज करण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व वाहनधारक व अर्जदार नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच ज्यांना अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे त्यांनी नियोजित दिवशी सकाळी 7.30 ते दुपारी 1 या वेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis