
बीड, 15 मार्च (हिं.स.)। सोलापूर-बीड रोडवरील चौसाळा शिवार परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. गोव्याहून आणल्या जाणाऱ्या अवैध विदेशी मद्याची वाहतूक उघडकीस आणत विभागाने तब्बल ५१ लाख ८८ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रकसह २०० बॉक्स मद्य हस्तगत करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोलापूर-बीड मार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने चौसाळा शिवार परिसरात सापळा रचला. दरम्यान, संशयित सहा चाकी अशोक लेलँड ट्रक थांबवून त्याची कसून तपासणी करण्यात आली.ट्रकमध्ये बनवला होता 'चोर कप्पा' तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना ट्रकमध्ये माल लपवण्यासाठी विशेष 'चोर कप्पा' तयार केल्याचे आढळून आले. या कप्प्याची झडती घेतली असता, त्यात गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे २०० बॉक्स लपवून ठेवलेले सापडले. प्रशासनाने मद्य आणि ट्रकसह एकूण ५१ लाख ८८ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कायदेशीर कारवाई आणि पथक या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमान्वये (६५ अ, ई, ८०, ८१, ८३, ९० व १०३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, संचालक (दक्षता) प्रसाद सुर्वे, उपआयुक्त (संभाजीनगर) संगीता दरेकर आणि अधीक्षक (बीड) विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. बी. खाडगीर करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis