पिंपरी-चिंचवडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ७८०८ कुटुंबांना मिळणार हक्काचे घर
पुणे, 20 मार्च (हिं.स.)। पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी महापालिकेकडून गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्
PM Awas Youjana


पुणे, 20 मार्च (हिं.स.)।

पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी महापालिकेकडून गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे सहा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ७ हजार ८०८ कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे.वाद न्यायालयात गेल्याने आणि मुदतीमध्ये जागा ताब्यात न आल्याने रावेत येथील गृहप्रकल्प रद्द करण्यात आला होता. तेथील लाभार्थ्यांना किवळेतील खासगी गृहप्रकल्पात सदनिका देण्यात आल्या. प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या रावेत येथील गृहप्रकल्पाचा पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी महापालिकेच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यांपैकी रावेत, पुनावळे, वडमुखवाडी, मामुर्डी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प असणार आहेत. ताथवडे, चोविसावाडीत बेघरांसाठी (एचडीएच गटासाठी) प्रकल्प असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande