पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद
लातूर, 20 मार्च (हिं.स.)। ग्रामीण भागातील जमीन व शेतीसंदर्भातील वादांमुळे सामाजिक तणाव निर्माण होऊन अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असे वाद वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक व सामाजिक त्रास सहन करावा
पोलीस


लातूर, 20 मार्च (हिं.स.)।

ग्रामीण भागातील जमीन व शेतीसंदर्भातील वादांमुळे सामाजिक तणाव निर्माण होऊन अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असे वाद वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक व सामाजिक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रत्यक्ष शेतात जाऊन वाद निवारण करण्याच्या या उपक्रमातून अत्यंत प्रभावी परिणाम दिसून येत आहेत.

🔷 *रेणापूर पोलीस ठाणे – दोन वर्षांपासून प्रलंबित वादाचा शेवट.*

रेणापूर पोलीस ठाणे हद्दीतील नेहरू नगर शिवारामध्ये अर्जदार सोमनाथ रमेश भोसले यांनी दिनांक १०/०२/२०२६ रोजी शेती रस्त्याच्या वादासंदर्भात तक्रार (NC क्र. ८४/२६) दाखल केली होती.

सदर वाद हा अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात मागील दोन वर्षांपासून सुरू होता. या कालावधीत परस्परांविरुद्ध ४ वेळा NC दाखल झाल्या होत्या. शेतात जाण्यासाठी १० फूट रुंदीचा रस्ता देण्याच्या मुद्द्यावरून वारंवार वाद, भांडणे व पोलीस तक्रारी होत होत्या; मात्र कायमस्वरूपी तोडगा निघत नव्हता.

“पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” या उपक्रमांतर्गत पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी स्टाफसह प्रत्यक्ष शेतात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गावातील प्रतिष्ठित नागरिक व दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवून सखोल चर्चा करण्यात आली.वादाचे मूळ कारण समजून घेऊन, सामाजिक सलोखा जपण्याच्या दृष्टीने व कायदेशीर बाबींचा विचार करून दोन्ही पक्षांची समजूत काढण्यात आली. परिणामी, दोन्ही पक्षांच्या संमतीने सामोपचाराने वाद कायमचा मिटविण्यात आला, ज्यामुळे दोन वर्षांपासून सुरू असलेला तणाव पूर्णतः समाप्त झाला.

🔷 *मुरुड पोलीस ठाणे – ८ ते १० वर्षांपासून सुरू असलेला वाद निकाली.*

मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भोसा येथे शंकर रंगराव खोसे, भीमराव रंगराव खोसे व लक्ष्मण व्यंकट खोसे यांच्यात ८ ते १० वर्षांपासून शेत रस्त्याचा वाद सुरू होता.या वादाच्या अनुषंगाने यापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया, तहसीलदार स्तरावरील सुनावणी, पोलीस ठाण्यात तक्रारी तसेच उपोषण व आत्मदहनाचे निवेदन देण्यात आले होते. तरीही वाद निकाली निघत नव्हता.दि. २०/०२/२०२६ रोजी तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे, पोलीस व महसूल कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. सुमारे ५ तास सखोल चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत रस्ता व नाली तयार करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व संबंधितांच्या संमतीने हा दीर्घकालीन वाद सामंजस्याने मिटविण्यात आला.

यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येऊन संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.

🔷 उपक्रमाचे व्यापक यश.🔷

या मोहिमेदरम्यान अवघ्या पाच दिवसांत ४९ जमीन व शेती वादांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले वाद यशस्वीरीत्या मिटविण्यात आले आहेत.

🔷 लोकाभिमुख पोलिसिंगचा आदर्श नमुना.🔷

“पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” हा उपक्रम केवळ वाद निवारणापुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागात विश्वास निर्माण करणारा, संवेदनशील व परिणामकारक पोलिसिंगचा आदर्श नमुना ठरत आहे.

🔷 नागरिकांना आवाहन🔷

जमीन व शेतीसंदर्भातील वाद असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा व सामंजस्याच्या माध्यमातून वाद मिटविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन लातूर पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande