
पुणे, 20 मार्च (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखलीतील म्हेत्रेवाडी शाळा क्रमांक ९३ येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने पट वाढवा’ या विशेष प्रवेश मोहिमेचा शुभारंभ आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. शाळेत नव्याने प्रवेश घेऊन आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुक्तांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसेवक यश साने, नगरसेविका प्रियांका कुदळे, रिटा सानप, शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापिका स्नेहल मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी या वेळी उपस्थित होते.
‘‘गुढीपाडवा – पट वाढवा’ ही मोहीम केवळ प्रवेश वाढविण्यापुरती मर्यादित नसून, प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण पोहोचविण्याचा हा व्यापक प्रयत्न आहे. महापालिका शाळांमधील आधुनिक सुविधा, समर्पित शिक्षकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रम यांच्या बळावर शिक्षणाची भक्कम पायाभरणी होत आहे. त्यामुळे अधिकाधिक पालकांनी या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना महापालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, तसेच या शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु