
पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करूनही सफाळे बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. नियमांची पायमल्ली करत अनेक विक्रेते निर्बंधांकडे दुर्लक्ष करत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.
बाजारपेठेत दररोज मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर होत असून संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. काही वेळा कारवाई केली जात असली तरी ती केवळ प्रतीकात्मक असल्याने दुकानदारांमध्ये दंडाची भीती उरलेली नाही. परिणामी प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
शासनाने प्लास्टिक बंदीसंदर्भात कठोर नियम लागू केले असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे परिसरातील स्वच्छतेवरही विपरीत परिणाम होत आहे.
पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. प्लास्टिक वापरावर पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, सफाळे परिसरात पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे. कापडी व कागदी पिशव्यांचा वापर प्रोत्साहित करून प्लास्टिकमुक्त बाजारपेठ उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL