
अकोला, 07 मार्च (हिं.स.) : अकोला महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसने स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केल्यानंतर अकोला काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते कपिल रावदेव यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह त्यांच्या जवळील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
कपिल रावदेव हे अकोला काँग्रेस कमिटीमध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. स्वीकृत नगरसेवकपदासाठी त्यांचे नाव निश्चित असल्याचे आधी सांगण्यात आले होते. मात्र ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आल्याने ते नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेस पक्षाला कायमचा रामराम ठोकला.गेल्या 20 ते 25 वर्षांपासून कपिल रावदेव हे काँग्रेस पक्षाशी जोडलेले होते. जवळपास अर्ध आयुष्य त्यांनी पक्षासाठी खर्ची घातले असूनही स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाली नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेसमध्ये पुन्हा परत जाणार नसल्याचे स्पष्ट करत, राजकीय पिंड असल्याने ज्या पक्षात मान-सन्मान मिळेल त्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचे रावदेव यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे अकोला काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे