हमीभावापेक्षा कमी दराने हरभऱ्याची विक्री; शेतकरी आर्थिक संकटात
अकोला, 07 मार्च (हिं.स.) : शासनाने हरभऱ्यासाठी हमीभाव जाहीर केला असला तरी खरेदीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा विकावा लागत आहे. बाजारात हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका ब
हमीभावापेक्षा कमी दराने हरभऱ्याची विक्री; शेतकरी आर्थिक संकटात


अकोला, 07 मार्च (हिं.स.) : शासनाने हरभऱ्यासाठी हमीभाव जाहीर केला असला तरी खरेदीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा विकावा लागत आहे. बाजारात हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

केंद्र शासनाने हरभऱ्याचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र शासनाच्या अटी कडक असल्यामुळे अनेक शेतकरी खासगी खरेदीदारांकडे वळत आहेत. प्रत्यक्षात खासगी बाजारातही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. परिणामी शेतकरी हमीभावाच्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उन्हाळा सुरू झाल्यामुळे लग्नसराई, मजुरांची मजुरी तसेच इतर तातडीच्या खर्चांसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मात्र हातात पैसा नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कमी दरातच खासगी बाजारात हरभरा विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे लूट होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात सोयाबीन आणि कापूसालाही अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा रब्बी हंगामावर होती.

मात्र हरभऱ्यालाही योग्य दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च तरी निघेल का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande