गोकुळ दूध संघाची ‘नारी सन्मान विमा योजना’
महिला दूध उत्पादकांना मिळणार २ लाखांपर्यंत विमा संरक्षण कोल्हापूर, 07 मार्च (हिं.स.) : गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादक महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिला दूध उत्पादकांना २ लाख र
गोकुळकडून महिलांचा सन्मान करताना चेअरमन नविद मुश्रीफ


महिला दूध उत्पादकांना मिळणार २ लाखांपर्यंत विमा संरक्षण

कोल्हापूर, 07 मार्च (हिं.स.) : गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादक महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिला दूध उत्पादकांना २ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च) निमित्त शिरगाव येथे आयोजित कार्यक्रमात गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे अनावरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. गोकुळ दूध संघ आणि द न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येणार आहे.

२०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानिमित्त ग्रामीण भागातील कष्टकरी दूध उत्पादक महिलांना सामाजिक व आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रारंभी गोकुळशी संलग्न असलेल्या सुमारे १ लाख महिला दूध उत्पादकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या योजनेसाठी वार्षिक प्रीमियम फक्त १५० रुपये ठेवण्यात आला आहे. त्यापैकी ३० टक्के म्हणजे ४५ रुपये गोकुळ दूध संघाकडून अनुदान स्वरूपात भरले जाणार असून उर्वरित १०५ रुपये लाभार्थी महिलांना भरावे लागतील. कमी प्रीमियममध्ये अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न गोकुळने केला असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.

१८ ते ७० वर्षे वयोगटातील गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांमधील महिला दूध उत्पादकांना ही योजना लागू असून विम्याचा कालावधी एक वर्ष राहणार आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande