कोल्हापूर : शिवाजी पेठेत महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर
कोल्हापूर, 07 मार्च (हिं.स.) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने महिलांसाठी विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीम परिसरात महिलांसाठी मोफत प्रशिक्
भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने महिलांसाठी कार्यक्रम


कोल्हापूर, 07 मार्च (हिं.स.) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने महिलांसाठी विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीम परिसरात महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्या वतीने आयोजित या शिबिराची सुरुवात भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, नगरसेविका अर्चना कोराणे, पूर्वा राणे आणि धनंजय नामजोशी यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी अरूंधती महाडिक यांनी सांगितले की, ८ मार्च हा जागतिक महिला दिन महिलांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. या निमित्ताने महिलांनी सक्षम, स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि उद्यमशील बनण्याचा संकल्प करावा. आज महिला विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने आपले कौशल्य आणि बुद्धिमत्ता सिद्ध करत आहेत. महिलांनी आपल्या अंगभूत कौशल्यांचा उपयोग करून उद्योग-व्यवसाय सुरू करावा. त्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी भागीरथी पतसंस्था सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरसेविका अर्चना कोराणे आणि पूर्वा राणे यांनीही मनोगत व्यक्त करत महिलांनी दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून स्वतःकडे लक्ष देणे, आरोग्याची काळजी घेणे आणि उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खाद्यमहोत्सव स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

यानंतर प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी महिलांना विविध पदार्थ व वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. यासोबतच शासनाच्या विविध योजनांची माहितीही महिलांना देण्यात आली.

या शिबिराला स्नेहल कोराणे, स्वाती चव्हाण, संगीता चव्हाण यांच्यासह वेताळमाळ तालीम परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.

----------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande