
रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : लांजा तालुक्यातील बौद्धगाव ते मणचे तर्फे देवधे परिसरात अचानक लागलेल्या वणव्यात सुमारे ३० एकर क्षेत्रावरील जंगली झाडे तसेच दहा ते बारा शेतकऱ्यांची आंबा व काजूची शेकडो झाडे होरपळून भस्मसात झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वणव्याची माहिती मिळताच लांज्याचे निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेत लांजा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार तसेच राजापूर येथील अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यांच्या समन्वयातून तातडीने अग्निशमन बंब घटनास्थळी पाठविण्यात आला. अग्निशमन पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. तसेच ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्यामुळे वणवा अखेर आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे परिसरात होऊ शकणारे आणखी मोठे नुकसान टळले.
या घटनेदरम्यान पुनस मंडळाचे मंडल अधिकारी रोहिदास राठोड, देवधेचे सरपंच राजाराम हरमले, पोलीस पाटील संदीप कांबळे, इतर अधिकारी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते.
वणव्यात आंबा व काजूची शेकडो झाडे होरपळून गेल्याने संबंधित बागायतदार आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी