एसीच्या किंमतीत 5 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ
मुंबई, 08 मार्च (हिं.स.)। उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच देशात एअर कंडिशनरच्या किमती वाढू लागल्या आहेत. डायकिन, व्होल्टास, ब्लू स्टार, एलजी, हायर आणि मित्सुबिशी यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी एसीच्या दरात पाच ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळ
AC prices increased by 5 to 15 percent


मुंबई, 08 मार्च (हिं.स.)। उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच देशात एअर कंडिशनरच्या किमती वाढू लागल्या आहेत. डायकिन, व्होल्टास, ब्लू स्टार, एलजी, हायर आणि मित्सुबिशी यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी एसीच्या दरात पाच ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे एसी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कंपन्यांच्या मते कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, आयात खर्च आणि नवीन ऊर्जा नियमांमुळे ही वाढ करावी लागली आहे.

एसी उत्पादनासाठी लागणारे तांबे आणि ॲल्युमिनियम यांचे दर गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे सुटे भाग आयात करणेही महाग झाले आहे. मालवाहतुकीच्या खर्चात झालेली वाढ आणि जागतिक पातळीवरील अस्थिरतेमुळेही कंपन्यांचा खर्च वाढला आहे. याशिवाय १ जानेवारी २०२६ पासून ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सीचे नवीन स्टार रेटिंग नियम लागू झाले आहेत. या नियमांनुसार एसी अधिक ऊर्जा कार्यक्षम बनवावे लागत असल्याने उत्पादन खर्च वाढल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

तथापि, नवीन नियमांमुळे ग्राहकांना काही प्रमाणात फायदा होणार आहे. उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, नवीन मानकांनुसार बनवलेले एसी आधीच्या तुलनेत सुमारे अकरा टक्के अधिक वीज बचत करतात. त्यामुळे एसी खरेदी करताना किंमत जास्त असली तरी दीर्घकाळात वीज बिल कमी येण्यास मदत होऊ शकते.

डायकिन इंडियाचे अध्यक्ष कंवलजीत जावा यांनी सांगितले की, नवीन ऊर्जा नियमांमुळे उत्पादने अधिक कार्यक्षम झाली आहेत, मात्र त्यांची किंमतही वाढली आहे. तांब्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असून डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे आयात खर्च वाढला आहे. त्यामुळे किमती वाढवण्याशिवाय कंपन्यांकडे दुसरा पर्याय नव्हता.

दरवाढ झाली असली तरी त्याचा परिणाम बाजारात लगेच दिसेलच असे नाही. काही डीलर्सकडे अजूनही जुन्या दरात घेतलेला स्टॉक उपलब्ध आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत काही ठिकाणी एसी तुलनेने स्वस्त मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतातील रूम एसी बाजाराचा आकार सुमारे एक कोटी पंचेचाळीस लाख युनिट्सचा आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर यंदा एसीच्या विक्रीत पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा कंपन्यांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande