
रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : कसबा (संगमेश्वर) येथे येत्या ११ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गोळवली येथील गोळवळकर गुरुजी स्मारक येथे धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिनासंदर्भात एक दिवसीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कार्यक्रमासंदर्भात नियोजन करण्यात आले. गेली ४ वर्षे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून बलिदान दिन कार्यक्रम केला जात आहे. त्यांच्या या कार्यक्रमामुळे जनजागृती करण्याबरोबर तरुण मुलांमध्ये चैतन्य आणले. याची दखल महाराष्ट्र शासनालासुद्धा घ्यावी लागली.
येत्या ११ मार्च रोजी बलिदान दिन कार्यक्रम कसबा येथे सकाळी १० वाजता होणार असून हिंदूधर्मीय व शिवप्रेमी मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियोजनाच्या बैठकीला प्रमोद अधटराव, विनोद म्हस्के, डॉ. अमित ताठरे, सुशांत मुळे, मयूर लिंबूकर, प्रशांत रानडे तसेच बहुसंख्येने सदस्य व शिवप्रेमी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी