
नाशिक, 08 मार्च (हिं.स.)।
जीएसटी तपास लवकर पूर्ण करण्यासाठी तब्बल एक कोटी २५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कर विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भांडाफोड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केला आहे. तक्रारदाराकडून २० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले असून, या प्रकरणात राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे आणि सहायक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दामोदर चौक परिसरात ही धडक सापळा कारवाई केली. या कारवाईमुळे राज्य कर विभागातील भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील ४७ वर्षीय तक्रारदाराच्या कार्यालयावर जीएसटीसंदर्भातील कारवाई सुरू होती. हा तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी राज्यकर उपआयुक्त सोमनाथ पागे आणि सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिद्र दोंदे यांनी तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराला इतकी मोठी रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १ मार्चला मुंबई येथील विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक 'एसीबी'ने तक्रारीची पडताळणी ४ मार्च रोजी केली.
यावेळी संशयित आरोपी अधिकाऱ्यांनी तडजोड लाचेची रक्कम एक कोटी रुपयांवर निश्चित केल्याचे समोर आले. त्यातील पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर एसीबीने करून सापळा रचून कारवाईची तयारी केली. शुक्रवारी दामोदर चौक येथील तक्रारदाराच्या कार्यालयात २० लाख रुपयांचा पहिला प्ता स्वीकारण्यासाठी आलेल्या र इसम अमित हिरामण जाधव वय ३६) याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात जाधव हा संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने लाच स्वीकारत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. उपआयुक्त सोमनाथ पागे यांच्या कार्यालयाची झडती घेतली. झडतीदरम्यान कार्यालयातून दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपी अधिकारी आणि खासगी इसम यांचे मोबाइल फोन तपासासाठी जप्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV