
रायगड, 08 मार्च (हिं.स.)। महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा उपक्रम ठरलेल्या ‘कन्याथॉन २०२६’ या विशेष मॅरेथॉन स्पर्धेला कर्जत शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘Run For Her’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत हजारो नागरिकांनी सहभाग घेत महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश दिला.
आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत परिसरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात या उपक्रमाला सुरुवात झाली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कन्याथॉन स्पर्धेत सुमारे तीन हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
१० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा विविध गटांमध्ये ही मॅरेथॉन पार पडली. तरुणांसह महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने धाव घेत या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश महिलांच्या शिक्षणाबाबत जनजागृती करणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा होता.
या कार्यक्रमावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. कन्याथॉनसारख्या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोठे सहकार्य केले. या उपक्रमामुळे कर्जत शहरात महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)