रायगड - गोठ्यात घुसला बिबट्या; तीन वासरांचा पाडला फडशा
रायगड, 08 मार्च (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील तुंगी गावात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालत एका रात्रीत तीन वासरांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्य
Leopard enters cowshed; kills three calves in Tungi village


रायगड, 08 मार्च (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील तुंगी गावात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालत एका रात्रीत तीन वासरांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुंगी गाव परिसरात शनिवारी रात्री बिबट्याने गोठ्यातील वासरांवर हल्ला करून त्यांना ठार केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून गाव परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा होती. मात्र एका रात्रीत तीन वासरे ठार केल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गावकरी घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा तसेच गावात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, तुंगी गावासह आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande