

रायगड, 08 मार्च (हिं.स.)। महाड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची अचानक धावपळ सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरातील तुटलेले बॅरिकेट्स कपड्यांच्या चिंध्यांनी बांधून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनावर जोरदार टीका होऊ लागली होती.
इतिहासप्रेमी आणि पर्यटक मोठ्या श्रद्धेने भेट देत असलेल्या रायगड किल्ल्यावर अशी दुरवस्था पाहून शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत होती. समाधी परिसरात गर्दी नियंत्रणासाठी उभारण्यात आलेल्या काही बॅरिकेट्सची अवस्था अत्यंत खराब झाली होती. काही ठिकाणी ते पूर्णपणे तुटलेले होते, तर काही बॅरिकेट्स तात्पुरते कपड्यांच्या चिंध्यांनी बांधून उभे ठेवण्यात आल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले होते.
दरम्यान, मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे रायगडावर येणार असल्याची माहिती समोर येताच प्रशासन अचानक खडबडून जागे झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली. दौऱ्यापूर्वीच संबंधित विभागांनी तातडीने बॅरिकेट्स दुरुस्त करण्याचे काम हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकारामुळे “मोठे नेते येणार तेव्हाच प्रशासनाला जाग येते का?” असा सवाल शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवरायांच्या इतिहासाशी निगडित असलेल्या रायगड किल्ल्यासारख्या पवित्र स्थळाची देखभाल कायमस्वरूपी आणि योग्य पद्धतीने व्हावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)