
नांदेड, 08 मार्च (हिं.स.)।
भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत
दरोडा टाकलेल्या सहा आरोपींना भाग्यनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील गुन्ह्यातील आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांचे सहकारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली की, भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा प्रकरणातील आरोपी हा पावडेवाडी येथील तुलसी पार्क येथे वॉचमन म्हणून नौकरी करीत आहे. गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांचे सहकारी सदरील आरोपींचा शोध घेण्यासाठी पावडेवाडी येथील तुलसी पार्क येथे गेले असता सदरील आरोपी हा तुलसी पार्क येथील सार्वजनिक रस्त्यावर असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी करुन नाव गाव विचारले
असता सदरील आरोपीने आपले नाव सांगितले. गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दरोड्याची कबुली देत आपल्या मित्रांच्या मदतीने दरोडा टाकला असल्याची कबुली दिली. आरोपी संतोष तुकाराम शेळके यांच्या माहितीवरुन पोलिसांनी या दरोड्यातील सहा जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख २०हजार, एक मोबाईल, दोन मोटारसायकल, तलवारी, लोखंडी रॉड असा तीन लाख ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis