
रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : पत्नीशी झालेल्या वादाच्या रागातून आपल्या आठ वर्षांच्या मुलावर चाकूने वार केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना कुवारबाव रेल्वे स्टेशन फाटा येथे घडली. महेश उदय यादव (वय ३६, रा. निवे बुद्रुक, सरोदेवाडी – संगमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. महेश यादव आपल्या मुलगा तेज (वय ८ वर्षे) याला शांतिनगर येथून आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८, एक्यू ३३४६) मधून मारुती मंदिर येथील खाऊगल्ली येथे घेऊन गेला होता. तेथून पुन्हा घरी जात असताना त्याला खेडशी येथे एक भाडे मिळाले.
भाडे सोडून परत येत असताना त्याला पत्नीचा फोन आला. फोनवर दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या महेश यादवने रिक्षामध्येच मुलाच्या हातावर चाकूने वार केला. या घटनेप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी