येवला–वैजापूर महामार्गावर भीषण अपघात; वृद्ध मृत्यूमुखी
येवला, 15 एप्रिल (हिं.स.) येवला–वैजापूर महामार्गावरील गवंडगाव शिवारातील देवळाने चौफुली येथे मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत एक जण जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात नातवाला आणायला प्रवरा संगम
येवला–वैजापूर महामार्गावर भीषण अपघात; वृद्ध मृत्यूमुखी


येवला, 15 एप्रिल (हिं.स.) येवला–वैजापूर महामार्गावरील गवंडगाव शिवारातील देवळाने चौफुली येथे मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत एक जण जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात नातवाला आणायला प्रवरा संगम जवळ गेलेल्या सोयगाव (ता. मालेगाव) येथील साठ वर्षाचा ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातस्थळावरून जात असलेल्या एका महिला डॉक्टरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन जखमींचे प्राण वाचले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास येवला–वैजापूर महामार्गावर गवंडगावजवळील देवळाने चौफुली येथे मालवाहू ट्रक (KA 25 D 8123) आणि स्विफ्ट कार (MH 41 BL 9928) यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील सुरेश भाऊराव शिंदे (रा. सोयगाव, ता. मालेगाव) यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

महिला डॉक्टर ठरल्या देवदूत

अपघात घडला त्याच वेळी येवला शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय या आपल्या वाहनाने त्याच मार्गावरून जात होत्या. अपघाताचे भीषण स्वरूप आणि जखमींची अवस्था पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडी थांबवली. दोन जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती आणि त्यांचा श्वास थांबला होता. अशा कठीण प्रसंगी डॉ. क्षत्रिय यांनी ‘सीपीआर’ तंत्राचा प्रभावी वापर करून त्यांना जीवदान दिले. त्यांच्या तत्परतेमुळे मृत्यूच्या दारात असलेल्या दोघांचे प्राण वाचले. जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. डॉक्टरांच्या या माणुसकीच्या कार्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande