
रायपूर , 15 एप्रिल (हिं.स.) छत्तीसगडमधील सक्ती जिल्हा येथे असलेल्या वेदांता पावर प्लांट मधील भीषण अपघातानंतर कंपनीने मृत आणि जखमींसाठी नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना 35 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच गंभीर जखमींना 15 लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाईल. याशिवाय मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासनही कंपनीने दिले आहे. या घोषणेनंतर प्रभावित कुटुंबांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मात्र, स्थानिक नागरिकांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.मंगळवारी या पावर प्लांटमध्ये भीषण बॉयलर स्फोट झाला होता, ज्यात 14 कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 32 कामगार जखमी झाले असून त्यापैकी 6 जण जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. अपघाताच्या वेळी प्लांटमध्ये सुमारे 50 कामगार उपस्थित होते.
दरम्यान, अपघातानंतर अनिल अग्रवाल, वेदांता समूहाचे अध्यक्ष, यांनी एक्सवर पोस्ट करत आपली वेदना व्यक्त केली. त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत याला वैयक्तिक नुकसान असल्याचे म्हटले. एकीकडे अध्यक्षांनी हा प्रसंग कुटुंबाच्या दुःखासारखा असल्याचे सांगितले, तर दुसरीकडे काँग्रेसचे महासचिव कन्हैया अग्रवाल यांनी याला थेट व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम ठरवले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, प्लांटमध्ये सुरक्षा नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. स्फोट इतका भीषण होता की कामगारांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.
सक्ती जिल्ह्यातील या पावर प्लांटमध्ये मुख्यतः वीज निर्मितीचे काम केले जाते. येथे कोळशाच्या वापरातून वीज तयार केली जाते, जी आसपासच्या औद्योगिक क्षेत्रांना आणि वीज वितरण ग्रिडला पुरवली जाते. या प्रक्रियेत कोळसा प्रक्रिया, बॉयलर ऑपरेशन आणि टर्बाइनद्वारे वीज निर्मितीचा समावेश असतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode