वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे निवेदन!
अकोला, 17 एप्रिल (हिं.स.)। अकोला शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व शहराध्यक्
Photo


अकोला, 17 एप्रिल (हिं.स.)।

अकोला शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व शहराध्यक्ष सौरभ भगत यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या अकोला शहरातील तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून प्रचंड उष्णतेची लाट सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या असतानाही अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळा दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेत पालकांना उन्हात थांबावे लागत असून पालक व लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या वेळेत तात्काळ बदल करून शाळा सकाळी लवकर सुरू करून सकाळी ११ वाजेपर्यंत सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande