
पुणे, 18 एप्रिल (हिं.स.)।
भारतीय संगीतातून मनाला शांती आणि समाधानाबरोबरच व्यक्तिमत्वात सकारात्मकता निर्माण होते. देशभक्तीपर गीते प्रत्येकाच्या मनात राष्ट्रकार्यात सहभागी होण्याची प्रबळ प्रेरणा जागवतात, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका शांता कुमारी (शांताक्का) यांनी केले.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंचावर आयोजित 'राष्ट्रभक्ति का चिरंतन प्रवाह' या सांगीतिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आणि राष्ट्र सेविका समितीच्या ९० व्या वर्षपूर्तीनिमित्त 'आकार' संस्थेच्या वतीने या दोन्ही संघटनांचा समांतर प्रवास उलगडणारा हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी, महापौर मंजूषा नागपूरे, प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव, 'आकार'च्या संस्थापिका चित्रा देशपांडे, अभिनेते अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर, हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, व्यंकटेश स्कायलाईफचे संजयभाई धावडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे लक्ष्मिकांत सोमकुसरे, केप्र मसालेचे केदार भट आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात 'चरैवेती चरैवेती यही तो मंत्र है अपना', 'निर्माणों के पावन युग में' आणि 'हम करें राष्ट्र आराधन' यांसारख्या स्फूर्तिदायक देशभक्तीपर गीतांनी वातावरण राष्ट्रभक्तीने भारून टाकले. या सांगीतिक प्रवाहीपणाबद्दल बोलताना चित्रा देशपांडे म्हणाल्या की, संघ आणि समितीचा प्रदीर्घ आणि ध्येयवादी प्रवास सांगीतिक स्वरूपात मांडणे हे एक मोठे आव्हान होते, जे 'आकार'ने यशस्वीपणे पूर्ण केले.
महापौर मंजूषा नागपूरे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, हा कार्यक्रम भारताच्या सांस्कृतिक जागृतीचा दैदिप्यमान अध्याय आहे. राष्ट्र सेविका समितीने स्त्रीला केवळ गृहिणीपर्यंत मर्यादित न ठेवता तिला 'राष्ट्रनिर्माती' म्हणून घडवले आहे आणि भारतीय स्त्रीचा स्वाभिमान खऱ्या अर्थाने जागृत ठेवला आहे.
या सोहळ्यात वाळूशिल्प कलेद्वारे प्रभावी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनी आकांक्षा कोल्हे व वैष्णवी मोरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना श्रीकांत कोठे आणि आनंद कुलकर्णी यांची होती. सूत्रसंचालन कल्पेश कुलकर्णी यांनी केले, तर सुप्रिया गोडबोले यांनी प्रभावी निवेदन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु