
बीड, 20 एप्रिल (हिं.स.) : जल जीवन मिशन अंतर्गत परळी तालुक्यातील मलनाथपूर येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य शासनाने वाढीव प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
यापूर्वी या योजनेसाठी सुमारे ६७.७१ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र वस्तू व सेवा करातील वाढ तसेच तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली. परिणामी आता १ कोटी ८६ लाख ५२ हजार रुपयांच्या सुधारित खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे.
जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाने काही अटी व शर्तींसह ही मंजुरी दिली आहे. मंजूर निधीच्या मर्यादेतच काम पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे राहणार असून, सर्व शासकीय नियम, निविदा प्रक्रिया आणि तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
योजना पूर्ण झाल्यानंतर ती संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली जाणार आहे. तसेच देखभाल व दुरुस्तीचा खर्च स्थानिक स्वराज्य संस्थेलाच उचलावा लागणार आहे. याशिवाय, योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावी यासाठी आवश्यकतेनुसार पाणीपट्टी दरात वाढ करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis