
पुणे, 20 एप्रिल (हिं.स.)। पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकने प्रोटेक प्रकल्प स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऑटोमेशन आणि रोबोटिक्स या विषयात यश संपादन करत पीसीपीच्या बहुउद्देशीय शेती रोबोट प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
लवळे येथील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पीसीपी मधील इ. अँड टी. सी. विभागाच्या हर्षल जाधव, साईराज सुरवसे, पुष्कर सोनवणे व वेदांत काळे या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प सादर केला होता. आताच्या काळात युवकांचे रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर यामुळे शेती साठी मजुरांची कमतरता, वाढता खर्च आणि वेळे अभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्यांचा विचार करून विद्यार्थ्यांनी सादर केलेला रोबोट विविध आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असून शेतीतील अनेक कामे स्वयंचलित पद्धतीने करू शकतो. बीज पेरणी, पिकांवर फवारणी, गवत कापणे, जमिनीतील ओलावा तपासणे, तापमान संवेदक, सौर ऊर्जा, नांगरणी, मोबाइल ॲपद्वारे नियंत्रण, आर्द्रता, आवाजाद्वारे नियंत्रण यांसारखी कामे अचूक आणि जलद गतीने करतो. यामध्ये सेन्सर व स्वयंचलित नियंत्रण प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या रोबोट मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. मानवी श्रम कमी होणे, वेळेची बचत, कमी खर्चात शेती करणे तसेच पिकांची निगा अधिक चांगल्या प्रकारे राखणे शक्य होईल. त्यामुळे उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होऊन शेती अधिक आधुनिक व सुलभ बनू शकते. पीसीपी चे प्राचार्य डॉ. विद्या ब्याकॉड यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. ---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु