
जिल्हाधिकारी कार्यालयाचा अहवाल सादर
पुणे, 20 एप्रिल (हिं.स.) : टेमघर प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करताना झालेल्या अनियमिततेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (पुनर्वसन शाखा) सविस्तर अहवालातून गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या तपासणीत अनेक कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याने हे प्रकरण शासनाच्या रडारवर आले आहे.
अहवालानुसार, जमीन वाटप प्रक्रियेदरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंब सदस्यांची संख्या, वारसनोंदी तसेच 7/12 उताऱ्यांतील माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. काही प्रकरणांमध्ये वारसत्व सिद्ध करणारे आवश्यक पुरावे सादर न करता जमीन वाटप करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, काही लाभार्थ्यांचे वय, नाते आणि कुटुंबातील स्थान याबाबतही स्पष्ट व अचूक नोंदी नसल्याचे निदर्शनास आले आहे.
विशेषतः गट क्रमांक 229, 239, 318 आणि 331 या जमिनींच्या वाटपात क्षेत्रफळ आणि संपादन तपशीलात गंभीर विसंगती आढळली आहे. एकूण वाटप क्षेत्र आणि प्रत्यक्ष संपादित क्षेत्र यामध्ये फरक असल्याने संपूर्ण प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू ठेवण्याचे संकेत दिले असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु