
जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) : शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने जोरदार पावले उचलली असून, मंगळवारी (21 एप्रिल) अतिक्रमणविरोधी मोहिमेचा दुसरा टप्पा आक्रमकपणे राबवण्यात आला.
महापालिकेचे पथक शहरातील वर्दळीच्या आकाशवाणी चौक ते प्रभात चौक परिसरात पोहोचताच अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. या मार्गावरील समांतर रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत हॉकर्स आणि टपरीधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. परिणामी, वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
आजच्या कारवाईदरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण हटवले. या धडक कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले असून, वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
समांतर रस्ते हे शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मात्र, अतिक्रमणामुळे येथे वारंवार कोंडी होत होती. मनपाच्या या कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील रस्ते पूर्णपणे अतिक्रमणमुक्त होईपर्यंत आणि वाहतूक सुरळीत होईपर्यंत ही धडक मोहीम सुरूच राहणार आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर